शिवभक्त बालब्रम्हचारी प.पू. अरविंद महाराज यांचे महानिर्वाण

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : कोपरगाव शहरातील ऐतिहासिक दत्ता पार येथील बालब्रम्हचारी शिवभक्त प.पू. अरविंद महाराज(८५) यांचे काल दि .२ जानेवारी रोजी एकादशीच्या दिवशी महानिर्वाण झाले. बाजारतळ येथील लक्ष्मी माता मंदिराजवळील प्रांगणात साधू-संत,महंतांच्या उपस्थितीत स्थानिक व त्रंबकेश्वर येथील ब्रम्हवृदांच्या मंत्रघोषात त्यांना मंत्राग्नी देण्यात आला.यावेळी अनेक भाविक भक्तांनी आपल्या अश्रुची वाट मोकळी केली.

१९७२ साली प.पू .अरविंद महाराज यांचे दत्तापार येथे आगमन झाले होते. आयुष्यभर शिव नामस्मरणातून पंचक्रोशीला कीर्तन प्रवचनातून अखंड सत्संग विचार त्यांनी दिले. शहरातील विविध धार्मिक, सामाजिक कार्यातून त्यांनी समाजाला प्रबोधन केले. “शिवपुराण” या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले होते.

यावेळी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी मंदिराचे मठाधिपती प.पू. रमेशगिरीजी महाराज, प.पू. राघ्वेश्वरानंदगिरी महाराज,प.पू.रामप्रभूजी महाराज (अंजनापूर), महामडलेश्वर मुक्तानंद महाराज, काशिकानंद महाराज (शिर्डी), बापुगिरीजि महाराज(चाळीसगाव)भागवताचार्य उकिरडे महाराज,जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे , मुख्याधिकारी शांताराम गोसावी, भाजपचे पराग संधान, संजीवनीचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, माजी नगरसेवक स्वप्नील निखाडे आदींनी आदरांजली वाहिली. पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.   

शिव नामस्मरण व शिव पुराणातून प.पू. अरविंद महाराजांनी अध्यात्म प्रसार जागविला.त्यांच्या जाण्याने कोपरगावकर खऱ्या अर्थाने पोरके झाले आहे .अरविंद महाराजांची अध्यात्मिक वाणी आणि शिकवण अनंत काळाचा ठेवा असणार आहे. – स्नेहलता कोल्हे, माजी आमदार, भाजप प्रदेश सचिव

गेली ५० वर्षे अरविंद महाराज हे कोपरगावकरांना भक्तीचा संदेश देत होते. शिवमहापुराण कथा सांगुन धर्म कार्याची धुरा त्यांनी अविरत सांभाळली होती. – संत रमेशगिरी महाराज