कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून या निधीतून अनेक रस्त्यांची कामे झाली आहेत. मात्र यापैकी काही रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये सांशकता आहे. त्याबाबत कोपरगाव नगरपरिषदेने स्वयंस्पष्ट अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
दिलेल्या निवेदनात गंगुले यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांसाठी आ. आशुतोष काळे यांनी निधी दिल्यामुळे खराब रस्त्यांना वैतागलेल्या कोपरगावकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र यापैकी काही रस्त्यांच्या बाबतीत संबंधित ठेकेदाराकडून गुणवत्तेकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
यामध्ये कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल व ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळ नगरी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गुणवत्तेनुसार झालेले नसतांना देखील त्या रस्त्याच्या कामाचे देयके संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आली आहेत. याबाबत खात्रीलायक माहिती मिळाली आहे. रस्त्याचे काम दर्जाहीन झालेले असतांना देखील संबंधित ठेकेदाराला त्या निकृष्ट कामाचे देयके अदा करणे यातून शासनाच्या निधीची उधळपट्टी केली जात आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य कोपरगावकरांना पडला आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम खरा की खोटा? हे स्पष्ट करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल व ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळ नगरी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गुणवत्तेनुसार झाले किंवा नाही याबाबतचा त्रयस्थ कंपनीकडून अहवाल तयार करून घ्यावा.
त्याचबरोबर गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून देखील सदर रस्त्यांच्या गुणवत्तेची योग्य माहीती व लेखी तपशील घेवून आपला स्वयंस्पष्ट अहवाल प्रसिद्ध करून नागरिकांच्या मनात सुरु असलेला गोंधळ थांबवावा अशी मागणी सुनील गंगुले यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.