कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत ध्वजारोहण होत असताना महाराष्ट्राच्या रथातून आपल्या संस्कृतीचे दर्शन झाले आणि संध्याकाळी समता इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या कलाविष्कारातून भारत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. मुलांनी केलेल्या सादरीकरणातून समता स्कूलची उडान प्रशंसनीय आहे.या उपक्रमामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला आणि त्यांच्या कलेचा अप्रतिम आविष्कार पहायला मिळाला, असे मत शिर्डी येथील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी व्यक्त केले.
समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये उडान २०२२ – २३ या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तसेच शिर्डी विमानतळाचे डेप्युटी कमांडर अमिश कुमार, संजीवनी गोविंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे गोविंद शिंदे यांचा सत्कार समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक अरविंद पटेल, डेप्युटी कमांडर अमिश कुमार यांचा सत्कार समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक चांगदेव शिरोडे तर संजीवनी शिंदे यांचा सत्कार मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला.
स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य समीर अत्तार यांनी करून दिला. प्रास्ताविकातून ब्रिटिश कौन्सिल कडून शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा पुरस्कार, खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरीसोबत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कृती कार्यक्रमाचे आयोजन, रंगोत्सव स्पर्धा तसेच आर्ट वोल्कॅनोत मुलांचे यश यांसह स्कूलचा प्रगतीचा वार्षिक अहवाल सादर केला.
ते पुढे म्हणाले की, समता इंटरनॅशनल स्कूल मुलांच्या कला – गुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम आयोजित करत असते. त्या उपक्रमांमधून मुलांना कला – गुण विकसित करण्याची संधी प्राप्त करून देत असते. मुलांना मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या शिक्षणामुळे शैक्षणिक दृष्ट्याही अहमदनगर जिल्ह्यात समता स्कूल नावाजलेले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने इतर शाळांनी देखील समताचा आदर्श घेऊन विविध उपक्रम आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे.
मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे म्हणाल्या की, दरवर्षी घेत असलेल्या उपक्रमामुळे शिक्षक आणि पालक यांचे संबंध दृढ होण्यास अधिक मदत होते. या वर्षी उडान (आजादी से बुलंदी तक) संकल्पनेच्या आधारे भारत स्वतंत्र होण्यासाठी जे देशभक्त, समाज सुधारक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७ पासून भारत देशाने सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेणारे हे स्नेहसंमेलन आहे.
तसेच समता स्कूल उभ्या असलेल्या ठिकाणी १२ वर्षांपूर्वी पिण्याचे पाणी देखील ४ कि.मी.अंतरावरून आणावे लागत असे. त्या ठिकाणी आज समताच्या मॅनेजमेंटने सेमी ऑलिंपिक साईजचा स्विमिंग पूल उभारून मुलांच्या शारीरिक विकासाच्या दृष्टीने देखील उडान घेतली आहे.
स्नेहसंमेलनाची सुरुवात स्वागत गीताने करत भारत देश या पात्राद्वारा भारतीय संविधान, हरितक्रांती, श्वेतक्रांती, शैक्षणिक विकास , औद्योगिक विकास, भारतीय संरक्षण दल, मनोरंजन, क्रीडा, भारतीय अवकाश, संशोधन संस्था, तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत देशाचे जगातील प्रभावशाली स्थान व महत्त्व विशद करत देशभक्तीपर, सामाजिक, सांस्कृतिक मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील विविध गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
तसेच २०२२ – २३ या वर्षात सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, पातळीवर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह आणि बक्षिसे देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरणाचे सुत्रसंचालन शिर्डी येथील समता टायनी टॉट्सच्या प्राचार्य माही तोलानी यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी मुख्य कार्यवाहक संदिप कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे गोविंद शिंदे, शिर्डी विमानतळाचे डेप्युटी कमांडर अमिश कुमार, संजीवनी गोविंद शिंदे, समता इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाह संदीप कोयटे, समता पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन श्वेता अजमेरे, ज्येष्ठ संचालक अरविंद पटेल, गुलाबचंद अग्रवाल,चांगदेव शिरोडे, कांतीलाल जोशी, गुलशन होडे, सिमरन खुबानी, हर्षल जोशी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदींसह विद्यार्थ्यांचा पालक वर्ग, हितचिंतक परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितांचे आभार आदिती रावलिया हिने मानले.
मुलांचा सर्वांगीण विकास हा आमचा मुख्य उद्देश आहे. तुमची मुलं, ती आमची मुलं या प्रमाणे एका पाल्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर संस्कार करत असतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिकदृष्ट्या हिताचे निर्णय घेत विविध उपक्रमही राबवत असतो. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास झाल्याने ते वेगवेगळ्या क्षेत्रात संधीचे सोने करत आहे. – सौ.स्वाती संदीप कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी, समता इंटरनॅशनल स्कूल.