शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : शेवगाव पाथर्डी सह ५४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा वीद्यूतपुरवठा मोठ्या थकबाकीच्या कारणास्तव महावितरण कंपनीने काल बुधवारी सायंकाळी खंडित केला. मुळातच शेवगाव शहराला दहा-बारा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो. पाथर्डी रस्त्यावरील संत तुकाराम नगर सारख्या विस्तारीत भागात तर आज चौदावा दिवस असूनही नळाला पाणी सुटले नसल्याची तेथील नागरिकांची तक्रार आहे.
नळाला पाणी सुटले तरी तेही अत्यंत कमी दाबाने व जेमतेम वीस पंचविस मिनिटे टिकते. त्यामुळे शेवगावाला सातत्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई सोसावी लागते. त्यातच आता महावितरणने योजनेचा वीज पुरवठा खंडीत केल्याने शेवगावकरांची दुष्काळात तेरावा अशी स्थिती झाली आहे.
याबाबत वीज वितरण कंपनीचे येथील सहाय्यक अभियंता अतुल लोहारे यांचेसी संपर्क साधला असता, शेवगाव पाथर्डी सह तालुक्यातील विविध पाणी पुरवठा योजना उच्च दाब ग्राहक असल्याने त्याचे नियंत्रण नगरच्या वरिष्ठ कार्यालयाकडून होते. या योजनाकडे मोठी थकबाकी असून या योजनेच्या कीमान चालू बिलाचा भरणा देखील केलेला नसल्याने सदर योजनेच्या खंडोबा माळ, दहिफळ, अमरापूर, सोने सांगवी आदि पाच ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.