कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : भारतातील सर्वात कमी पगारावर काम करणारे कर्मचारी हे शालेय पोषण आहार योजनेतील स्वयंपाकी व मदतनीस हे आहेत. आज ते 53 रुपये रोजने काम करीत आहे. शिवाय त्यांच्यावर पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी व शालेय परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी आहे. परंतु आज त्यांना फक्त दीड हजार रुपये महिना या तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. त्यांना अध्याप कोणीही मदत केली नाही म्हणून त्यांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत लढा देत राहणार असे सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघाच्या जिल्हाध्यक्षा सविता विधाते यांनी सांगितले.
श्रमिक मजूर संघ कोपरगाव शाखेची बैठक कोपरगाव येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थित आयोजित केली होती. प्रमुख पाहुणे म्हणून सविता विधाते हा उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे कोपरगावचे निमंत्रक प्रकाश पान पाटील, संदीप देशमुख, दिपाली भागवत ,ज्योती जावळे, विद्या अभंग आदि हजर होते. संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे पंधरा हजार रुपये मानधन आणि शासकीय सेवा मिळवण्यासाठी लढा देणार असल्याचे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक संदीप देशमुख यांनी केले तर दिपाली भागवत यांनी आभार मानले.