कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : तालुकास्तरीय विकासाचा कुठलाही आराखडा हा लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार तयार होतो. हा प्रस्ताव केंद्र किंवा राज्य ज्या ठिकाणाहून निधी उपलब्ध होणार आहे त्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींची सूचना असेल तरच निधी मिळतो. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांचा विकास आराखडा तयार करून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यातून पोहेगाव-देर्डे चांदवड-कुंभारी रस्त्यासाठी ७.८१ कोटी निधी मिळविला आहे.
मात्र विकासनिधी कुठून मिळतो याची माहिती नसणारे आ. आशुतोष काळे यांच्यावर टीका करीत आहे ती त्यांची लायकी नाही. ज्यांना ग्रामपंचायतीचा निधी कुठून मिळतो याची माहिती नाही अशा अर्धवटरावांनी केंद्र व राज्य सरकारवर बोलू नये असा उपरोधिक टोला राजेंद्र रामचंद्र औताडे यांनी सरपंच अमोल औताडे यांना लगावला आहे.
राजेंद्र औताडे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी अथक पाठपुरावा करून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेकडो कोटीचा निधी आणून रस्त्यांचा प्रश्न सोडविला आहे त्यामुळे काम न करणाऱ्यांची पोटदुखी वाढली आहे. त्यामुळे कुठतरी आ. आशुतोष काळे यांच्यावर बिनबुडाची टीका करायचा काहींनी नवीन धंदा सुरु केला असला तरी अशा अर्धवटरावांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
मतदार संघातील पोहेगाव-देर्डे चांदवड- कुंभारी रस्त्याला मंजुरी जरी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मिळाली असली तरी सुचविण्याचे काम आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. त्यासाठी वेळोवेळी बैठका घेवून पाठपुरावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे त्याचे श्रेय तेच घेणार आणि त्याचा त्यांना अधिकार देखील आहे. मात्र ज्यांना काही करायचे नाही त्यांनी नुसती आदळ आपट करून उपयोग नाही.
या रस्त्याला जरी निधी केंद्र सरकार कडून मंजूर झाला असला तरी त्यासाठी तयार करण्यात आलेले प्रस्ताव आणि शिफारशी स्थानिक पातळीवरून पंचायत समिती सभापतीकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी शिफारस दिल्यानंतर हा प्रस्ताव पंतप्रधान ग्राम सडक योजनेकडे सादर करण्यात आला त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
कोणत्या रस्त्यांना कुठून निधी मिळवायचा याची उत्तम जाण असलेल्या आ. आशुतोष काळे यांनी या रस्त्याची खराब झालेली अवस्था लक्षात घेवून या रस्त्याच्या कामाला प्रथम प्राधान्य द्यावे अशी मागणी केली होती व त्यासाठी पाठपुरावा देखील केला होता त्या पाठपुराव्याची हि फलश्रुती आहे. त्यामुळे ज्यांना फक्त निधी दिसतो मात्र त्यासाठी कोण पाठपुरावा करतो हे दिसत नाही. त्यामुळे अशा अर्धवट रावांनी यापुढे आपली पायरी ओळखून टीका टिप्पणी करावी असा उपरोधिक सल्ला देखील राजेंद्र रामचंद्र औताडे यांनी सरपंच अमोल औताडे यांना दिला आहे.