जन स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जन जागृती

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : विकासाची स्वप्न दाखवत काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने देशावर राज्य केले, मात्र मोठे पक्ष जनतेच्या हिताचे नाही. याची जनतेच्या मनात कायम खदखद राहिली आहे. दोन-तीन वर्षात तर राज्यात व देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू असून सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे जनतेच्या समस्यांकडे अजिबात लक्ष नाही. म्हणूनच शेतकरी, युवक, कामगार, महिला अशा सर्वांच्या प्रश्नांसाठी जनतेला जागृत करण्याचे काम जन स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आपण हाती घेतले असून, ठिकठिकाणी या मोहिमेस मोठा पाठिंबा मिळत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निघालेली जनस्वराज्य यात्रा तालुक्यातील दहिगावने, शहरटाकळी, भातकुडगाव फाटा येथे कार्यकर्त्याच्या भेटी घेत चर्चा करत, दुपारी शेवगावात आल्यावर उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांचे समवेत पक्षाचे राष्ट्रीय संघटक सुशिल पाल, प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते, अजित पाटील, रविद्र कोठारी, परमेश्वर वाघमोडे, महिला संघटनेच्या सुवर्णा चव्हाण होते.

जानकर म्हणाले, शिक्षण, आरोग्य आदि क्षेत्रात समानता आली पाहिजे. व्यवस्था बदलल्याशिवाय सामान्य जनतेची प्रगती ही होणार नाही. त्यामुळे योग्य वेळी जनता आपल्या मनातील खदखद मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त करील. राष्ट्रीय समाज, पक्षाची जनस्वराज्य यात्रा राजकारणासाठी नाही, तर जनतेच्या भल्यासाठी आहे. शेतकऱ्यांनी सोलर पावर पद्धतीचा अवलंब केला, तर शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा सहज शक्य असल्याने, त्याबाबतही शासनाला जागे करण्याची गरज आहे. गरीबाच्या मुलांनी नेतृत्व केले पाहिजे.

मात्र त्यांना संधी दिली जात नाही. यासाठी प्रादेशिक पक्षाची आवश्यकता असून आम्ही जनतेची कामे करण्याचा ध्यास घेऊन जनजागृतीसाठी जनस्वराज्य यात्रा निघाली आहे. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रल्हाद यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील लाडे, गुरुदत सामाजिक प्रतिष्ठान संस्थेचे सचिव फुलचंद रोकडे यांचे हस्ते जानकर यांचा सत्कार करण्यात आला.

आत्माराम कुंडकर, राजेंद्र घनवट, वसंत गव्हाणे, बाबा शेख, बाबा वाकडे, यांचेसह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पैशाची कमतरता नाही, यावेळी दहा वर्षाच्या, आरोही उत्तम डोईफोडे या बालिकेने जानकर यांना, नोटांचा हार घालून इंग्रजीत शुभेच्छा दिल्या. त्यावर समाजकारण व राजकरण करत सातत्याने घराबाहेर फिरतो, मात्र पैशाची अडचण येत नाही. जेथे जातो, तेथे असे जीव लावणारे आरोही सारखे लहान थोर भेटतात. असे म्हणून जानकर यांनी तो हार स्विकारला.