ऊसाची पहिली उचल जाहीर करवी तो पर्यंत ऊसतोड करण्यात येऊ नये कार्यकर्त्यानी रोखून धरली वाहने

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ : यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊसाची पहिली उचल जाहीर करण्यात यावी तो पर्यंत ऊसतोड करण्यात येऊ नये या मागणीच्या पाठपुराव्यासाठी बुधवार दि. १५ ला अल्टीमेटम शेतकरी संघटनेने दिला होता. मात्र, कारखाना प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने बुधवारी
तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याच्या परिसरात तसेच भातकुडगाव फाट्यावर ऊस वाहतूक करणारी वाहने संघटनेच्या कार्यकर्त्यानी रोखून धरली.

यावेळी झालेल्या प्रचंड घोषणाबाजी मुळे परिसर दणाणून गेला. तेव्हा तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी ही कोंडी फोडण्यासाठी मध्यस्थी करून सोमवारी (दि.२०) शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, साखर कारखान्याचे प्रतिनिधी, साखर उपायुक्त, प्रान्ताधिकारी आदिच्या उपस्थितीत बैठक आयोजित केल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

चालू हंगामासाठी साखर कारखान्यांनी अद्याप पर्यंत ऊसाचा दर जाहीर केला नाही. म्हणून बुधवारी शेवगाव-पैठण हम रस्त्यावरील गंगामाई साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. जोपर्यंत साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नाही. तोपर्यंत कोणत्याही प्रकारे ऊसाची वाहतूक होवू दिली जाणार नाही. अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. तर नेवासा रस्त्यावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, मच्छिंद्र आरले, संतोष गायकवाड संदीप मोटकर आदिसह कार्यकर्त्यांनी ऊसाची वाहने रोखून धरली होती.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वरचे माजी चेअरमन, माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांच्यासह संचालक मंडळाशी सविस्तर चर्चा करून ज्ञानेश्वरने तातडीने ऊस दर जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, उपाध्यक्ष दत्ता फुंदे, संतोष गायकवाड, मच्छिंद्र आरले, बाळासाहेब फटांगडे, तालुकाध्यक्ष मेजर अशोक भोसले, संदीप मोटकर, पाथर्डी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गर्जे, संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष माऊली मुळे, रमेश कचरे, दादा पाचरणे, दादा टाकळकर, रामेश्वर शेळके, विकास साबळे, नाना कातकडे, रामेश्वर शेळके, शिवाजी साबळे, अमोल देवढे, संकेत कचरे, नाना कातकडे  तसेच पंचक्रोशीतील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.