गोदावरी नदी संवर्धनाच्या २०.१७ कोटी निधीला हिरवा कंदील – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० :- कोपरगाव मतदार संघाच्या रखडलेल्या विकासाला चालना देवून कोपरगाव शहराचा देखील चेहरा मोहरा बदलणाऱ्या आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून गोदावरी नदी संवर्धनासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यापुढे सादर करण्यात आलेल्या गोदावरी नदी संवर्धनाच्या २० कोटी १७ लक्ष रुपये खर्चाच्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती आ. आशुतोस काळे यांनी दिली आहे.  

गोदावरी नदी कोपरगावकरांना मिळालेली अमूल्य देणगी आहे. पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या व धार्मिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोपरगाव शहराला पश्चिमेकडून पूर्वेला वाहणाऱ्या गोदामाईचा मोठ्या स्वरूपात नदीकाठ लाभलेला आहे. कोपरगाव शहराला वळसा घालणाऱ्या पवित्र गोदावरी नदीकाठ सुशोभित होवून गोदावरी नदीचे संवर्धन व्हावे अशी असंख्य गोदाप्रेमींची व भाविकांची मागणी होती.

त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी पर्यावरणाचे रक्षण होवून गोदावरी नदी संवर्धनासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करावा अशा सूचना कोपरगाव नगरपरिषदेला दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेने गोदावरी नदी संवर्धनाचा २० कोटी १७ लक्ष निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या पुढे शुक्रवार (दि.०९) रोजी नगरपालिका शाखा सहआयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रशांत खांडकेकर, मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी, अभियंता सुर्यकांत गवळी यांनी सादर केला होता.  

सदर प्रस्तावाची जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तरपणे माहिती जाणून घेत या प्रस्तावास संमती दिली असून आ. आशुतोष काळेंच्या पुढाकारातून या प्रस्तावास लवकरच राज्य शासनाची मान्यता मिळणार आहे. या २० कोटी १७ लक्ष निधीच्या प्रस्तावामध्ये दोन किलोमीटर पर्यंत नदी सफाई, दोनही बाजूने दोन किलोमीटर साईड लेव्हल, नदी घाट सुशोभिकरण, सायकल ट्रॅक, पथ रस्ता, ड्रेनेज ड्रायव्हर्जन, सोलिंग पिचिंग, रिटनिंग वाल, गॅबेयीन वाल, टॉयलेट ब्लॉक, प्लांटेशन, लँड स्किपींग, सोलर लाईट, ब्युटीफिकेशन आदी कामे करण्यात येणार असून गोदावरी नदीकाठचे सुशोभिकरण होवून कोपरगाव शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची गोदाप्रेमींची व भाविकांची मागणी यानिमित्ताने पूर्ण होणार असून त्यामुळे गोदामाईचा पर्यावरणीय र्‍हास कमी होवून नदीच्या पूराचा धोका देखील कमी होण्यास मदत होणार आहे. गोदामाईच्या किनारी सुशोभिकरण होवून सार्वजनिक ठिकाण निर्माण  होणार आहे. त्यामुळे कोपरगावकरांचे जीवनमान निश्चितपणे उंचावणार असून गोदाप्रेमी व भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.