तालुका पोलिसांनी २ लाखाचा मुद्देमाल केला जप्त
कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : कोपरगाव शहरासह तालुक्यात गुटखा विक्री जोमात असल्याने अनेक नागरीक कोमात जात आहेत. अशातच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी धडाकेबाज कारवाई करुन गुटखा विक्री करणाऱ्या दोघावर कारवाई करीत गुटख्यासह २ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तालुक्यातील गुटखा बंदी व अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली असुन शिवजयंतीच्या राञी ९ च्या दरम्यान कोपरगाव शहरातील प्रसिद्ध गुटखा व्यापारी वासीम चोपदार याच्या मालकीचा हिरा नावाचा गुटखा व तंबाखू जर्दा भरलेल्या दोन गोण्या भरुन मारुती सुझुकी वॅगनर एम एच ०१ वाय ए ०३४० या क्रमांकाच्या गाडीतुन विक्रीसाठी कोळपेवाडी ते हनुमाननगर कोळपेवाडी या रस्त्याच्या दरम्यान अश्पाक महेबुब मनियार रा. हनुमाननगर कोपरगाव हा जात होता.
पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस कर्मचारी महेश कुसारे, अंबादास वाघ, संदीप बोटे, अविनाश तमनर, अनिश शेख, गजानन वांढेकर, सुरेश घागरे, विलास कोकाटे आदींच्या पथकांनी सापळा रचून गुटख्यासह त्याला ताब्यात घेतले. पोलीस कर्मचारी अविनाश तमनर यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वसीम चोपदार व अश्पाक महेबुब मनियार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान वसीम चोपदार हा गेल्या अनेक वर्षांपासून गुटखा विक्रीत अग्रभागी आहे. संपूर्ण तालुक्यात गुटखा विक्रीचे त्याने जाळे निर्माण केले आहे. विशेष म्हणजे कोळपेवाडी येथील काही बडे व्यापारी गुटखा विक्रीमध्ये माहीर आहेत. कोळपेवाडी हे गुटखा विक्रीचे मोठे केंद्र आहे हे जगजाहीर असतानाही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या काही पोलीसांना माहिती असुन सुद्धा त्याकडे डोळेझाक का केली जाते.
एकंदरीत सध्या तालुक्यासह जिल्ह्यात गुटखा विक्री जोमात आहे. पण शरीराला घातक असणारा गुटखा विक्री करुन नागरीकांना कोमात टाकण्याचे काम गुटखा विक्रेत्यासह त्यांचे पाठीराखे सरकारी बाबु करीत असल्याचे उघड झाले आहे.