भागवत कथा श्रवणासाठी बहिण-भाऊ कोपरगावात

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : वडील किर्तनकार होते, लहानपणापासून अध्यात्माची आवड, इयत्ता नववीत असतांना फी भरायाची अडचण त्यामुळे पुढे शाळा शिकता आली नाही, पण अध्यात्माच्या शाळेत गुरु भक्कम असले की कुठलीच अडचण भासत नाही असे सांगत ते भाऊ-बहिण भागवत कथा श्रवणासाठी कोपरगावात मुक्कामी दाखल झाले आहेत. 

येथील तह‌सील कचेरीच्या मैदानावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण व ९५ व्या जयंती निमीत्त भागवताचार्य महंत, गोदावरी धामचे गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या रसाळवाणीतून संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. त्याच्या श्रवणासाठी येवला तालुक्यातील रस्ता सुरेगांव येथील रघुनाथ बारकू मिस्तरी उर्फ गायकवाड व मथुरा पांडुरंग राजगुरू (नाशिक) हे बहिण भाऊ आले आहेत.

रघुनाथ बारकु गायकवाड यांनी आजवर येवला, वैजापुर, विरगांव, दिघी तळेगांव, तळेगांव मळे या पाच ठिकाणी मुक्कामी राहून भागवत श्रवण केले असून कोपरगावी त्यांचे सहावे भागवत आहे. रामगिरी महाराज जेव्हा जेव्हा संगीतमय भजन घेतात तेंव्हा तेव्हा रघुनाथ गायकवाड उभे राहून, टाळ्या वाजवून, नाचत भगवत भक्तीचा आनंद घेतात. ते म्हणाले असा आनंद कशातच नाही. भागवत श्रवणात कधी कधी त्यांच्या पत्नी यमुना रघुनाथ गायकवाड हया देखील सह‌भागी होतात. कोपरगावी संयोजकांनी उत्कृष्ट भागवत कथा नियोजन केले असेही ते म्हणाले.