शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : सामाजिक कार्यकर्ते, तथा शेवगाव रोटरी क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन बाळासाहेब चौधरी यांचे हातून खेड्यापाडयातील शेतकरी, कष्टकरी, सामान्य गरीबांना दृष्टिदानाचे होत असलेले कार्य अतिशय महान असल्याचे प्रतिपादन येथील न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य किसनराव माने यांनी केले. अंधमुक्त शेवंगाव तालुका या संकल्पनेतुन विद्यानगरमधील विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या प्रांगणात आयोजित मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
या मोफत नेत्ररोग तपासणी व शस्रक्रियाशिबीरामध्ये तालुक्यातील १२ गावातील ५६ रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली. त्यामधील २१ नेत्र रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड झाली. त्यांच्यावर आज पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच गेल्या आठवडयात वरुर येथेही झालेल्या मोफत नेत्ररुग्ण तपासणी शिबीरात १०६ नेत्ररुग्णाची तपासणी करुन २८ जणांच्या मोफत शस्त्रक्रीया करण्यात आल्या.
शेवगाव रोटरी क्लब, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, विद्यानगर, बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिबीरे घेण्यात आली. येथून पुढे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला विठ्ठल रुख्मिणी मंदिरात हे शिबीर घेण्यात येणार आहे.
शिबिरासाठी जेष्ठ समाजसेविका श्रीमती स्नेहलता लबडे, रोटरी क्लब ऑफ शेवंगाव सिटीचे अध्यक्ष तथा अंधमुक्त व्हिलेज संकल्पना प्रोजेक्ट चेअरमन बाळासाहेब चौधरी, बुधराणी हॉस्पिटलच्या डॉ मीरा पटारे, विठ्ठल रुख्मिणी देवस्थानचे विस्वस्त दत्तात्रय काळे तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराचे प्रास्ताविक बाळासाहेब चौधरी यांनी केले तर आभार दत्तात्रय काळे यांनी मानले.
रोटरीचे प्रोजेक्ट चेअरमन बाळासाहेब चौधरी हाडाचे समाजसेवक आहेत. त्यांच्या अमरापूर ग्रामपंचायतीच्या निकणुकीत त्यांना सरपंचपदासाठी उभे करण्यात आले. त्यात ते पराभूत झाले. मात्र त्या बद्दल खंत करत घरात न बसता दूसऱ्याच दिवशी असलेल्या वरुरच्या मोफत नेत्रशिबीराचे नियोजनाची सर्व व्यवस्था त्यांनी पार पाडली. त्यांनी रोटरीच्या व बुधराणी हॉस्पिटलच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास २५ मोफत नेत्र शिबीरे. घेतली त्यात एकूण २ हजार ६०० नेत्ररुग्णांची तपासणी करून त्यातील ६०० वर रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत.