शेवगाव प्रतिनिधी, दि. ३१ : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ३० जानेवारी महात्मा गांधी हुतात्मा दिवस, धर्मनिरपेक्षता वाचवा दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत शेवगाव येथील पैठण रस्त्यावरील महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याची स्वच्छता करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर झालेल्या सभेत भाकपचे राज्य सचिव अॅड सुभाष पाटील लांडे म्हणाले, दि. ३० जानेवारीला संपूर्ण देश गांधींना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. याच दिवशी हिंदू धर्मांध गोडसेने त्यांची हत्या केली. गांधींनी वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या लढ्यात आणि देशाच्या मुक्तीसाठी केलेल्या भूमिकेव्यतिरिक्त, एक अतिशय महत्वाचा संदेश सर्वांना दिला.
‘आपल्या देशातील ‘ हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि धार्मिक सलोखा” हा त्यांच्या जीवनाचा संदेश होता. ज्यावेळी भाजप-आरएसएस युती लोकांमध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी, द्वेष पसरवण्यासाठी, परिस्थितीचे सांप्रदायिकीकरण
करण्यासाठी आणि मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक दलित आणि आदिवासी लोकांच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण करण्यासाठी आक्रमक आहे, तेंव्हा धर्मनिरपेक्ष लोकशाही शक्तींनी एकजूट दाखवून घटनेतील धर्मनिरपेक्ष तत्त्वांचे पालन व रक्षण केले पाहिजे.
या प्रसंगी कॉ बापूराव राशिनकर, संदीप इथापे, बबनराव पवार, दत्तात्रय आरे, कारभारी वीर, वैभव शिंदे,राम लांडे, शरद लांडे, सुरेश चव्हाण, चंद्रकांत लबडे, बाबुलाल सय्यद व नागरिक उपस्थित होते.