संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय देशात पहिल्या शंभरीत

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ४ : असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इडिया (असोचॅम) या संस्थेने राष्ट्रीय शिक्षण  धोरण २०२० अनुसरून डिजिटलायझेशनशी निगडीत देशव्यापी सर्वेक्षण करून संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे डिजिटलायझेशनच्या अंमलबजावणीमध्ये गुणवत्तेच्या आधारावर देशात पहिल्या १०० क्रमांकाच्या यादीत असल्याचे जाहिर करून दिल्ली येथे एका शानदार कार्यक्रमात तसे प्रमाणपत्र दिले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे टेक्निकल डायरेक्टर विजय नायडू व संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. ए.जी.ठाकुर यांनी हे प्रमाणपत्र स्विकारले, अशी माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, असोचॅम ही संस्था १९२० साली स्थापन झाली असुन भारतातील व्यापार व वाणिज्य हितसंबंधाचे प्रतिनिधित्व करते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय  व्यापाराला चालना देणे तसेच भारतातील उद्योगाला चालना देणे या संस्थेचे उद्धिष्ट  असुन देशभरातील ४. ५ लाखाहुन अधिक कंपन्या असोचॅमच्या सदस्य आहेत. या सर्व कंपन्यांमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाचे योगदान महत्वपुर्ण मानले जाते. भारत सरकारने जाहिर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण  धोरण २०२० (एनईपी २०२०२) मध्ये डिजिटलायझेनला (कागद विरहीत कारभार) महत्व देण्यात आले आहे.

या संकल्पनेला अनुसरून देशातील कोणती अभियांत्रिकी महाविद्यालये आपला दैनंदिन कारभार करतात, याची तपासणी असोचॅन नॅशनल कौन्सिल ऑन एज्युकेशनने केली. यात संजीवनी अभियांत्रिकी हे महाविद्यालय देशात  पहिल्या १०० महाविद्यालयांमध्ये असल्याचे असोचॅमने जाहिर करून संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला.

संजीवनी अभियांत्रिकीच्या वतीने डॉ. शैलेश  पालेकर यांनी डिजिटलायझेनच्या अनुषंगाने पुराव्यानिषी असोचॅमला माहिती पुरविली. यात प्रामुख्याने कागद विरहीत विध्यार्थ्यांची व सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या  माहितीची नोंद, अकौंट विभागात वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर्स, परीक्षा व्यवस्थापनासाठीचे सॉफ्टवेअर्स, विध्यार्थी व पालकांना विध्यार्थ्यांच्या हजेरी बाबत तसेच इतरही प्रगती संदर्भातील अॅप व संदेश यंत्रणा, विध्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या ऑनलाईन नोटस्, सर्व संबंधितांकडून विविध बाबींसदर्भातील अभिप्राय प्राप्त करण्यासाठी डीजिटल प्लॅटफॉर्मचा वापर, अशा अनेक बाबींचा उहापोह करण्यात आला. या सर्व बाबींना असोचॅमने एनईपी २०२० चा आधार घेत अनुरूपता दिली.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व टीमचे हे महाविद्यालयात देशात  पहिल्या शंभरीत असल्याचे सिध्द झाल्याबध्दल अभिनंदन केले.

    संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक, माजी मंत्री, सहकार महर्षि  कै. शंकरराव  कोल्हे यांची आधुनिकतेची कास धरून पुढे जावे, ज्या पालकांनी संजीवनीवर विश्वास  टाकुन त्यांची पाल्ये  शिक्षणासाठी दाखल केली, त्या पाल्यांसाठी उत्तमोत्तम शिक्षण  देवुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी  शिकवण असायची. आजही कै. कोल्हे यांनी घालुन दिलेल्या मार्गदर्शक  तत्वांनुसार संजीवनीचे व्यवस्थापन कार्य करीत देशाच्या शैक्षणिक  पटलावर नवनवीन किर्तीमान स्थापित करीत आहे. देशात  सुमारे ६००० अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यात आयआयटी, एनआयटी अशा  संस्थांचाही समावेश आहे. यातुन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय पहिल्या १०० क्रमांकात असणे, ही बाब कोपरगांव सारख्या ग्रामीण भागाला भुषणावह आहे.- अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स