डॉ. प्रशांत भालेराव, राजेंद्र पानकर, गहिनीनाथ बडे पुरस्कार यांना जाहीर

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : शेवगाव तालुका पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व मराठी पत्रकार परिषद यांच्यावतीचे ‘मराठी पत्रकार दिना’ निमित्त दिला जाणारा ‘सामाजिक पुरस्कार’ सिस्टर फ्रान्सिस्का, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव व बाळासाहेब चौधरी यांना तर ‘पत्रकारीता क्षेत्रातील पुरस्कार पत्रकार महादेव दळे, राजेंद्र पानकर यांना तर वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील पुरस्कार गहिनीनाथ बडे यांना जाहीर झाला आहे.

       बुधवारी ( दि. ११ ) सकाळी १० ला पुरस्कार वितरण सोहळा व अक्षय मतिमंद विद्यालय व शेवगाव येथील उचल फाउंडेशनला साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन येथील स्वराज मंगल कार्यालयात श्री जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक हभप राम महाराज झिंजूर्के यांचे हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती शेवगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलासराव बुधवंत व मराठी पत्रकार संघाचे शेवगाव तालुका अध्यक्ष सचिन सातपुते यांनी दिली.

     आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलेल्या दर्पण वृत्तपत्राचा स्थापना दिन ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिनानिमित्त शेवगाव तालुक्यातील पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीचा सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार नित्यसेवा हॉस्पिटलच्या सिस्टर फ्रान्सिस्का, रेणुकामाता मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव, शेवगाव रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांना
तर पत्रकारीता क्षेत्रातील पुरस्कार वीरभूमीचे संपादक महादेव दळे, पत्रकार राजेंद्र पानकर यांना तर वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील पुरस्कार बोधेगाव येथील गहिनीनाथ बडे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, शेवगाव तालुका पत्रकार संघ व मराठी पत्रकार परिषद यांच्यावतीने करण्यात आले आहे.