पतंगाच्या धाग्याने जाती धर्माच्या भिंती तोडल्या 

कोपरगावमध्ये पतंगाच्या धाग्याने सर्व धर्मांना एकवटले 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : आपला देश विविध जाती धर्मांच्या परंपरेने नटलेला आहे.  जाती धर्मांच्या काही दलालांनी  या देशात कितीही जातीभेद पसरवण्याचा प्रयत्न केला किंवा दोन धर्मात,पंथात तेढ निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याची विकृती केली तरीही या देशातील सर्व धर्माचे नागरीक एकमेंकांच्या सुखादु:खात सामील होतात. याची प्रचिती कोपरगाव मध्ये पुन्हा एकदा आली.

मकरसंक्रातीच्या दिवशी संपूर्ण कोपरगाव मध्ये पतंगोत्सव स्वयंस्फुर्तीने साजरा केला. हजारो नागरीक पतंग उडवताना दंग होते. डेजेच्या तालावर गच्ची गच्चीवर पतंगाची फडफड सुरु होती. मोठमोठ्याने आरडा ओरड करीत एकमेकांच्या पतंगाची स्पर्धा लक्षवेधी होती. पतंग उडविण्यात सर्व धर्माचे बांधव आपाल्या घरावर पतंगाची आसारी फिरवीत धाग्याल झटका मारत आकाशात पतंग उडवत होते. 

मकर संक्रातीचा हा सण केवळ हिंदूंचा नसुन समस्त भारतीयांचा आहे असेच भासत होते. शहरातील मोठ्यमोठ्या उंच इमारती पासुन अगदी झोपडपट्टीतल्या छपराच्या घरात राहणाऱ्या बहुतांश मुलांच्या हातात पतंग दिसत होते. सण कोणत्या धर्माच्या परंपरेचा व रुढीचा आहे. याचा कसलाही विचार न करता सर्वजण एक दिलाने घराघरावर चौका चौकात पतंग उडवताना दिसत होते. कोणामध्ये कोणताही भेदभाव नाही, पतंग उडविण्यासाठी विशिष्ट धर्मासाठी विशिष्ट जागा नाही. 

पतंगाचा धर्मानुसार कोणातही विशिष्ट रंग नाही, येथे धाग्याचा रंग ठरवला जात नाही. ज्या रंगाचा पतंग सापडेल तो पतंग आपला समजुन तुटलेले पतंग गोळा करणारे मुलांची धावपळ वेगळीच असते. कोणाच्याही इमारतीवर, कोणत्याही मंदीर, मस्जिद, चर्च, बुध्द विहारच्या आजु बाजुने बिनदास्त कोणीही कधीही असाही जात होतो. पतंग उडवणाऱ्यांना धर्माच्या प्रार्थना स्थळापेक्षा फक्त पतंग आणि लटकलेला धागा दिसत होता. कोणताही भेद मनात नसणारे असंख्य मुलं पतंग उडवण्यात, दुसऱ्याचं पतंग कापण्यात दंग होती. 

आपल्या  मुलांना पतंग उडवण्या बरोबर पतंग आणुन देण्याची मदत मुलांचे पालक संगिताच्या तालावर नाचत आनंदाने करीत होते. पतंगासाठी पैसे कितीही गेले तरी चालतील पण मुलांचा आनंद व पतंग उडवण्याचा हट्ट पुरवला पाहीजे इतकी माफक आशा असणारे हेच पालक इतर वेळेस आपल्या जाती धर्मावर का येतात किंवा त्याच्या नावाने दरी का निर्माण करतात असा प्रश्न या निमित्याने पडतो. कोपरगाव शहराच्या संपूर्ण परिसरात मकर संक्रातीचा हा दिवस जोश व जल्लोषाचा वाटला. पतंगोत्सवात सामील होण्यासाठी बहुतांश व्यापाऱ्यांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून दुकानांना टाळे लावल्याने कोपरगावमध्ये अघोषित बंद असल्यासारखे चिञ बाजारपेठ दिसत होते. ८० टक्के दुकाने बंद होती.

सर्व जातीधर्माचे दुकानदार या उत्सवात सामिल झाल्याने मकर संक्रात हा सण खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभावाची शिकवण देणारा आणि एकीचे दर्शन घडवणारा वाटला. मकरसंक्रात या सणावरून आपल्या देशाच्या एकीचे खरे स्वरुप दिसुन येते. मताच्या राजकारणासाठी किंवा धर्माच्या नावावरुन आपलीच लाल करुण घेणाऱ्यांनी किमान पतंग उडवणाऱ्या लहान मुलांकडून बोध घ्यावा. लहान मुलांच्या उत्सवाला धर्म नसतो, त्याला रंगांचाही भेदाभेद नसतो. आम्ही सर्व एक आहेत या देशाची परंपरा, सण, उत्सव सर्वांसाठी आहेत हे सिध्द केले.

निसर्गाने निमार्ण केलेल्या सृष्टीतील रंगांना वाटून घेतलेल्या धर्मांच्या दलालांनी हिरवा, भगवा, काळा, निळा, पिवळा, लाल, तांबडा, केशरी, अशा विविध रंगावरुन धर्माची कट्टरता सिध्द करण्याचा प्रयत्न करतात. धर्माच्या नावाने वाटून घेतलेल्या  रंगांनाही पतंग उत्सवात कोणीही कसलीच किंमत देत नाहीत. येथे कोणत्याही रंगाचे पतंग असले तरी त्याला आकाशातच उडवायचे असते. कोणत्याही रंगाचा धागा असला तरी एकमेकांची काटाकाटी सुरुच असते. तिथे भेद भाव दिसत नाही. कोणामध्येही अहंकार दिसत  नव्हता. फक्त आनंदोत्सवात रममाण होणारी निरागस मुलं दिसत होती.

निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव पहाण्यासाठी त्यांना जन्म देणारे पालक अपेक्षेच्या नजरेने मुलांचा आनंद द्विगुणित करुन  पतंग उडवण्यात मदत करत होती. कोपरगाव शहरातील पतंगोत्सव  खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरला. संपूर्ण शहरातील इमारतीवर पतंग उडवणारे मंडळी दिसत होती. आकाशात पतंगाची रस्सीखेच सुरु असल्याने गगनात भिरभिरणारे पाखरेही आज झाडांच्या फांदीवर शांत बसुन सर्वधर्मीय पतंगोत्सवाचा आनंद घेत होती. 

मकरसंक्रातीच्या दिवशी पतंगाच्या धाग्याने सर्व जाती धर्माच्या भिंती तोडल्या. एकीचे दर्शन घडवणारी ही मकरसंक्रांत सर्व जाती धर्मातील नागरीकांमध्ये  खऱ्या अर्थाने तिळासारख स्नेह आणि गुळासारखी गोडी वाढवणारी आहे.  हा गोडवा कायम  प्रत्येकामध्ये असाच असावा.