शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : थोरामोठ्यांचा आदर करा. कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ करतांना त्यांचे आशिर्वाद घेऊन ते सुरु केल्यास निश्चित तडीला जाईल. कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता शुद्ध आचरण ठेवा या श्रधेय वै.संत भगवान बाबा व वै.वामन भाऊ यांच्या शिकवणुकीचा आदर्श ठेवून शुद्ध आदर ठेवा आपले मानवी जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन तारकेश्वर गडाची महंत शांती ब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांनी येथे केले.
वै.वामन भाऊ व वै.भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमीत्त तालुक्यातील जोहरापुर येथे पार पडलेल्या तीन दिवशीय कीर्तन महोत्सवाची सांगता महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने आज मंगळवारी झाली. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांचा ‘ त् ‘देखीलासे माती खाता | दावियाने बांधी माता ‘ हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या काल्याची महती सांगणाऱ्या अभंगाचे उपस्थित भाविकांसमोर निरुपण केले.
काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने जोहरापुर येथील प्रत्येक घरापुढे सडा, रांगोळी काढून संपूर्ण गाव शुचिर्भूत करण्यात आले. त्यामुळे गावामधील वातावरण सुशोभित व आनंददायी बनल्याचे चित्र निर्माण झाले. महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांची गावामधून सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. त्यात तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. मिरवणुकीत टाळ, मृदुंग तसेच महिलांनी डोक्यावर कलश घेवुन मिरवणुकीचा आनंद वाढविला. ठिकठिकाणी महिलांनी महाराजांचे औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पालवे, सौ.मीरा पालवे यांच्यावतीने आयोजित महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.