अशोकराव काळे व आशुतोष काळे यांच्या निष्क्रियतेमुळे कोपरगावकरांवर पाणी संकट – राजेंद्र सोनवणे यांचे प्रत्युत्तर
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ जानेवारी २०२३ : ज्या नेत्यांमुळे कोपरगाव तालुक्याचे हक्काचे पाणी इतर भागात गेले त्यांच्या समर्थकांना भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्यावर बिनबुडाचे आरोप आणि टीका करण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही. कोपरगाव शहरातील नागरिकांवर आज जे पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे त्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची निष्क्रियता कारणीभूत आहे.
शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यात आ. काळे हे सपशेल अपयशी ठरले असून, आपले अपयश लपविण्यासाठी त्यांचे समर्थक बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा पलटवार माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांच्यावर केला आहे. निष्क्रीय आमदारांच्या चमच्यांनी आमच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांना सल्ला देण्याची अजिबात गरज नाही आणि त्यांनी त्या भानगडीत पडू नये, असा सणसणीत टोलाही सोनवणे यांनी गंगुले यांना लगावला आहे.
सुनील गंगुले यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राजेंद्र सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. नगर परिषदेच्या चुकीच्या नियोजनामुळे पाणी वितरण व्यवस्था कोलमडली आहे. नागरिकांना आठ दिवसांआड कमी दाबाने व तेही अत्यंत घाण पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असताना नगरपरिषद प्रशासन व तालुक्याचे लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा परिस्थित भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे हे शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
नुकतेच कोपरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या समवेत पाणी प्रश्न व शहरातील नागरिकांना भेडसावत असलेले इतर प्रश्न सुटण्यासाठी खुली बैठक घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणली. मुख्यतः कोपरगावचा पाणीप्रश्न सोडविण्यात विद्यमान आमदार आशुतोष काळे व त्यांचे वडील माजी आमदार अशोकराव काळे यांचे कसलेही योगदान नाही. उलट त्यांच्याच कारकिर्दीत पाणीप्रश्न गंभीर होत गेला आहे हे वास्तव आहे.
२००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा झाला तेव्हा आमदार असलेल्या अशोकराव काळे यांनी या कायद्याला मूकसंमती दिली. त्याचीच पुनरावृत्ती नंतर आ. आशुतोष काळे यांनी केली. दारणा धरणातून येवला तालुक्यातील ४० गावांना पाणी देण्याच्या निर्णयास आ. आशुतोष काळे यांनी मूकसंमती दिल्यामुळे कोपरगाव तालुक्याला हक्काचे पाणी गमवावे लागले.
विद्यमान लोकप्रतिनिधी आशुतोष काळे यांना तीन वर्षात शहराला रोज पाणी देऊ शकतो हे आश्वासन देऊन सत्ता भोगत आहे पण प्रत्यक्षात काळे यांचे अजेंडे शहराला पाणी देण्याचे नाही तर पाणी घालवण्याचे आहे. हे पाप झाकून ठेवून निष्क्रियता लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न आ. काळे आणि त्यांचे समर्थक करत आहेत, अशी टीका सोनवणे यांनी केली आहे.
ज्या ४२ कोटी खर्चाची पाणीपुरवठा योजना माजी आमदार अशोकराव काळे यांनी मंजूर करवून आणली हे धादांत खोटे आहे. ही योजना संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शासनाकडे मंजूर करवून आणली ही वस्तुस्थिती आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमित शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी नगर परिषदेच्या १, २ व ३ क्रमांकाच्या साठवण तलावासाठी सन १९७२, १९७५ व १९८६ मध्ये गोदावरी डावा कालव्याशेजारी येसगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मिळवून दिल्या.
जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना संजीवनी साखर कारखान्यात नोकऱ्या दिल्या. साठवण तलाव क्र.१ ते ३ द्वारे सन १९९१-९२ पर्यंत कोपरगाव शहरास व्यवस्थित पाणी मिळत होते; पण वाढती लोकसंख्या, तलावातील गाळ व बाष्पीभवनामुळे साठवण तलावाची क्षमता कमी झाल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली व रेशन कार्डावर पाणी देण्याची वेळ आली होती. ही स्थिती लक्षात घेऊन स्व. शंकरराव कोल्हे यांनी शहराची २०१५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन नवीन साठवण तलावासाठी येसगाव येथे ४० ते ४५ एकर जमीन उपलब्ध करून साठवण तलाव क्र.४ चे काम पूर्ण करून घेतले.तलाव क्रमांक ५ देखील याच जागेत आहे याचा विसर विरोधकांना पडला आहे. त्यामुळे पाणी प्रश्न सुटण्यासाठी योगदान कुणाचे राहिले आहे व कोण निव्वळ अफवांचे पाणी उधळत पाणी घालवण्याचे काम करत आले आहे हे शहराला पूर्ण ज्ञात आहे.
वाढती लोकसंख्या आणि शहराचे विस्तारीकरण याचा विचार करता बिपीनदादा कोल्हे यांनी भविष्यात शहरात पाण्याची समस्या उद्भवू शकते याचा विचार करून सन २००९-१० मध्ये केंद्र सरकारच्या युआयडीएसएसएमटी योजनेअंतर्गत शासनाकडे पाठपुरावा करून सन २०१२-१३ मध्ये ४२ कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करवून आणली. स्नेहलता कोल्हे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या योजनेस लागणारा अतिरिक्त ७ कोटी ५० लाखांचा निधी मिळवून दिला.
कोल्हे परिवाराने कोपरगाव शहर व तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आजपर्यंत मोठे योगदान दिले असून, आजही देत आहेत. मागील तीन वर्षात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आ. आशुतोष काळे यांना कोपरगावचा पाणीप्रश्न सोडविता आला नाही. केवळ घोषणाबाजी व आश्वासने देण्याशिवाय त्यांनी आजपर्यंत काहीच केले नाही. ज्यांनी कोपरगावचे पाणी घालवले त्यांनी आता हवेतल्या वल्गना करून कोपरगावकरांना पाणी देण्याची हास्यास्पद भाषा करू नये. कारण त्यांचा नाकर्तेपणा जनतेने पाहिला आहे, असा टोला सोनवणे यांनी गंगुले यांना हाणला आहे.