कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : मागील काही वर्षापासून कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीचा व कर्मचारी वसाहतीचा प्रश्न गंभीर झाला होता. त्याबाबत निवडून आल्यापासून केलेला पाठपुरावा फळाला आला असून ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व पोलीस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीसाठी २८.५० कोटीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव शहर व ग्रामीण असे दोन स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्माण केले होते. दोन्ही पोलीस स्टेशनच्या इमारतीपैकी शहर पोलीस स्टेशन इमारतीचे काम पूर्ण झाले असून ग्रामीण पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मात्र प्रलंबित होता.
ग्रामीण पोलीस स्टेशनचा कारभार सद्यस्थितीत ज्या ठिकाणी सुरु आहे त्याठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशीच काही परिस्थिती पोलीस कर्मचारी वसाहतीची देखील झाली होती.
कित्येक वर्षापूर्वी बांधण्यात आलेली हि पोलीस वसाहत राहण्यासाठी योग्य नसतांना व सोयी सुविधांचा अभाव असूनही प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंब जीव मुठीत धरून राहत होते. याची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासूनच अनेक शासकीय इमारतींच्या नुतनीकरणाबरोबरच कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीचा व कर्मचारी वसाहतीच्या नुतनीकरणाचा प्रश्न आपल्या मुख्य अजेंडयावर घेतला होता. तेव्हापासून तात्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या गृह आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
त्याबाबत मागीलवर्षी दि.६ एप्रिल रोजी महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, तात्कालीन गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील, तात्कालीन ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ हे कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी आले असता.
त्या कार्यक्रमातील जाहीर सभेत देखील आ. आशुतोष काळे यांनी तात्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, तात्कालीन गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीचा व कर्मचारी वसाहतीच्या झालेल्या दुरवस्थेची कैफियत मांडून निधीची केलेली मागणी अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी तात्काळ मान्य करून त्याच जाहीर सभेत निधी देण्याची जाहीर घोषणा देखील केली होती.
त्यानुसार ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व पोलीस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीसाठी २८.५० कोटीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निधीतून ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत,२ बीएचके ५६ कर्मचारी फ्लॅट, ३ बीएचके ०८ फ्लॅट, संरक्षक कंपाऊंड, पार्किंग व्यवस्था, वसाहतीच्या अंतर्गत रस्ते, ड्रेनेज सुविधा, लँडस्केपींगसह ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व कर्मचारी वसाहतीसाठी सौर उर्जेचा वापर करण्यात येणार आहे. तसेच पोलीस स्टेशन फर्निचर, लिफ्ट सुविधा व सुसज्ज अग्निशमन यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची झालेली वाताहत डोळ्यांना पाहवत नव्हती. अशा परिस्थितीत ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून चोवीस तास काम करणारे पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंब कसे दिवस काढीत असतील याची कल्पना करणे अवघड होते. त्यामुळे निवडून आल्यापासून पोलीस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लावायचाच असा मनाशी निश्चय केला होता. त्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना शब्द पाळणारा नेता अशी ख्याती असलेल्या ना. अजितदादा पवार यांनी मागील वर्षी कोपरगावच्या जाहीर सभेत निधी देण्याचे जाहीर केले होते तो शब्द आज पूर्ण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीचा व कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लागला याचे मोठे समाधान वाटते. – आ. आशुतोष काळे.