पीकविम्याची मुदत वाढवून द्या – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून २०२३-२४ पासून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करून पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.

त्यासाठी अंतिम मुदत हि ३१ जुलै पर्यंत देण्यात आलेली आहे. परंतु कोपरगाव मतदार संघातील अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे अजूनही पिक विमा घेवू शकलेले नाही. त्यामुळे पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दिलेल्या पत्रात आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना सुरु केलेली आहे.

या पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक विमा योजनेच्या संकेतस्थळावरून शेतकरी आपला अर्ज भरू शकणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ३१ जुलै अंतिम मुदत दिलेली आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे  कोपरगाव तालुक्यातील एकूण ६१ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ २४ हजार ७०० शेतकऱ्यांनीच पिक विमा योजनेचे अर्ज सादर केलेले असून ३६ हजार ३०० शेतकरी अजूनही आपले पिक विमा अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. तसेच कोपरगाव मतदार संघातील पुणतांबा मंडलातील ३३ हजार ७०० शेतकऱ्यांपैकी ९ हजार शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. उर्वरित २४ हजार ७०० शेतकऱ्यांनी तांत्रिक अडचणीमुळे आपले अर्ज भरू शकले नाहीत. 

त्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या सर्व मंडलातील ३६ हजार ३०० व पुणतांबा मंडलातील २४ हजार ७०० असे कोपरगाव तालुक्यातील सर्व मंडल व पुणतांबा मंडलातील जवळपास ६१ हजार शेतकरी अजूनही आपले पिक विम्याचे अर्ज दाखल करू शकले नाहीत. पावसाळा सुरु होवून दोन महिन्याचा कालावधी होत असून अजूनही कोपरगाव विधानसभा मतदार संघात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. जेमतेम पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केलेली आहे. परंतु पाऊस नसल्यामुळे खरीप पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे खरिपासाठी केलेला खर्च पिक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकतो.

त्यामुळे कोपरगाव मतदार संघातील सर्वच शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज दाखल होणे गरजेचे आहे. परंतु येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी पिक विमा अर्ज भरण्यासाठी जातात परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यांचे अर्ज पीक विमा योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड होत नाही. त्यामुळे कोपरगाव मतदार संघातील जवळपास ६१ हजार शेतकरी आजही पीक विमा योजनेचे अर्ज भरू शकलेले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या तांत्रिक अडचणीचा विचार करून पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.