कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राज्यस्तरीय जम्प रोप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व संघ सहभागी होणार आहे. अहमदनगर संघ ही या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांची निवड चाचणी १४ जानेवारी २०२३ रोजी कोपरगाव तालुक्यातील समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये दोन वयोगटात होणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे अध्यक्ष संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.
अधिक माहिती देताना कोयटे म्हणाले की, ही स्पर्धा १६ वर्षाखालील आणि १८ वर्षाखालील अशा दोन गटात होणार आहे. त्यासाठी दोन संघांची निवड जम्प रोप प्रशिक्षक निवड चाचणीतून करणार आहे. सांघिक प्रकारात ३० सेकंद स्पीड रिले आणि ३० सेकंद डबल अंडर रिले तर वैयक्तिक प्रकारात फ्री स्टाईल, ३० सेकंद स्पीड, डबल अंडर, ०३ मीटर इनडोअर या प्रकारात होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी स्पर्धकाची जन्मतारीख १६ वर्षाखालील गटासाठी १/१/२००५ नंतरची असावी तर १८ वर्षाखालील गटासाठी १/१/२००३ नंतरची असावी. प्रत्येक सहभागी स्पर्धकाने स्वतःची स्पोर्ट किट सोबत आणणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी जम्प रोप स्पर्धेच्या निवड चाचणीत सहभागी व्हावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे कार्याध्यक्ष दिलीप घोडके यांनी केले.
या निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या संघ आणि स्पर्धकांनी १३ जानेवारी २०२३ पर्यंत दुपारी २:०० वाजेपर्यंत संघाची व वैयक्तिक नोंदणी करावी.अधिक माहितीसाठी समता इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री. रोहित महाले (९७६७७४६२३४) तर अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे नितीन निकम (९९६०८०१०५५) यांच्याशी संपर्क साधावा.