शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शेवगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी थेट जनतेतून होणाऱ्या सरपंच पदासाठी ६९ तर ४० प्रभागातील ११६ जागांसाठी ४११ असे एकूण ४८० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
सरपंच पदासाठी अमरापूर येथे सर्वात जास्त १३ तर खामगाव व सुलतानपूर बुद्रुक येथे सर्वात कमी प्रत्येकी २ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दहीगावने येथे सर्वात जास्त ६१ तर खामगाव येथे सर्वात कमी १९ उमेवारी अर्ज दाखल झाले आहेत. सरपंच पदासाठी ग्रामपंचायत निहाय दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या पुढील प्रमाणे – अमरापूर १३, रांजणी १०, आखेगाव तिर्तफा, खानापूर प्रत्येकी ७ , जोहरापूर, भायगाव, दहीगाव ने, प्रभूवाडगाव प्रत्येकी ५, वाघोली, रावतळे-कुरुड्गाव प्रत्येकी ४, सुलतानपूर बुद्रुक, खामगाव प्रत्येकी २.
तर सदस्यासाठी गावनिहाय दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या पुढील प्रमाणे – दहीगाव ने ६१. अमरापूर ४७, जोहरापूर ४३, आखेगाव तीर्तफा ३९, रावतळे कुरुडगाव ३४, वाघोली ३१, खानापूर, सुलतानपूर बु, रांजणी प्रत्येकी २९, भायगाव २६, प्रभूवाडगाव २४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले इच्छुक व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती.
वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी दाखल करण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी नंतर निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार गुरुवारी व शुक्रवारी अशा शेवटच्या दोन दिवसी ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याच्या सुचनेनुसार व आज शुक्रवारी शेवटच्या दिवशी संध्याकाळी उशिरा ५.३० पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाटी वेळ वाढवून दिल्याने अनेकांनी शेवटच्या दिवशी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
सोमवारी (दि.५ ) ‘ उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून त्यानंतर बुधवारी (दि.७ ) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असल्याने बुधवारी या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.